ऐतिहासिक! सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची धुरा सुनेत्रा पवारांकडे; राजभवनात पार पडला शपथविधी

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
मुंबई/बुलढाणा: महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आज एका नव्या आणि ऐतिहासिक अध्यायाची सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर आज सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली असून, त्यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये अत्यंत भावूक वातावरणात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
अजितदादांच्या निधनानंतर आमदारांचा एकमुखी पाठिंबा
बुधवारी २८ जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. या धक्कादायक घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, पक्षाची एकजूट कायम राखण्यासाठी आणि दादांचा वारसा पुढे नेण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी एकमताने सुनेत्रा पवार यांची पक्षाचे मुख्य नेते म्हणून निवड केली. त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवून आमदारांनी पवार कुटुंबावर आपला विश्वास व्यक्त केला आहे.
राजभवनात आज संध्याकाळी पार पडलेल्या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्रिमंडळातील सदस्य आणि राष्ट्रवादीचे सर्व आमदार उपस्थित होते.सुनेत्रा पवार यांच्या रुपात राज्याला पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री मिळाल्याने हा महिला शक्तीचा मोठा सन्मान मानला जात आहे.




