बुलढाण्यात ३५९ हज यात्रेकरूंचे लसीकरण संपन्न; जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: हज यात्रा २०२६ साठी जाणाऱ्या जिल्ह्यातील यात्रेकरूंच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनातर्फे विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. २९ आणि ३० जानेवारी रोजी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत जिल्ह्यातील एकूण ३५९ हज यात्रेकरूंनी लस घेतली.
वैद्यकीय तपासणी व लसीकरण
सरकारच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, हज पोर्टलवरून बुलढाणा जिल्ह्यातील ३६६ यात्रेकरूंची यादी प्राप्त झाली होती. या सर्व यात्रेकरूंची २२ ते २४ जानेवारी दरम्यान सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर, २९ जानेवारी रोजी खामगाव येथे १३९ यात्रेकरूंचे, तर ३० जानेवारी रोजी बुलढाणा येथील ‘डी.ई.आय.सी.’ (DEIC) हॉलमध्ये २२० यात्रेकरूंचे लसीकरण यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.
अहवाल पोर्टलवर सादर होणार
लसीकरण आणि वैद्यकीय तपासणीची सर्व माहिती आता हज पोर्टलवर नोंदवण्यात येणार आहे. या माहितीच्या आधारे ‘फिट’ आणि ‘अनफिट’ यात्रेकरूंची अंतिम यादी सरकारकडून जाहीर करण्यात येईल.
प्रशासकीय व स्वयंसेवी सहभाग
हा कार्यक्रम जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यामध्ये नोडल ऑफिसर प्रवीण घुंटे, सहाय्यक डॉ. अर्शद सय्यद,जुनेद मिर्झा आणि डॉ. कमर खान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी हज कमिटीचे जिल्हा अध्यक्ष सै. दाऊद सै. ईसा, सचिव इरफान उल्ला खान, सदस्य रईस काजी, शेख छोटू, जिया उल्ला खान, जाहिरोद्दीन, शिराणी खान, सै. मोबिन, तला अहेमद, सै. आसिफ, सै. इकबाल, शेख फारुख आणि शेख निसार यांनी विशेष परिश्रम घेतले.




