शेतकऱ्याची कष्टाची पुंजी चोरणारा आंतरराज्यीय बॅगलिफ्टर जेरबंद बुलढाणा ​स्थानिक गुन्हे शाखेची कर्नाटकात धडक कारवाई; ५ लाख रुपये हस्तगत

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाची फी भरण्यासाठी शेतकऱ्याने बँकेतून काढलेले ५ लाख रुपये कारची काच फोडून लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय बॅगलिफ्टरला जेरबंद करण्यात बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. पोलीस पथकाने कर्नाटक राज्यातील शिवमोगा येथे सलग पाच दिवस तळ ठोकून मुख्य आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चोरीची संपूर्ण रक्कम हस्तगत केली आहे.

काय आहे प्रकरण?

रिसोड (जि. वाशिम) येथील रहिवासी नितीन जिजेबा परहाड यांची मुलगी श्रुती हिचा बुलढाणा येथील राजर्षी शाहू कॉलेजमध्ये बी.ए.एम.एस. (BAMS) अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित झाला होता. १६ सप्टेंबर २०२५ रोजी परहाड यांनी मुलीची फी भरण्यासाठी मेहकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमधून ५ लाख रुपये काढले. ते पैसे कारमध्ये ठेवून ते बुलढाण्याला आले. मात्र, अज्ञात आरोपींनी बँकेपासूनच त्यांचा पाठलाग केला होता. परहाड हे कॉलेजमध्ये गेले असताना आरोपींनी कारची काच फोडून ५ लाख रुपयांची बॅग पळवून नेली. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासाचे आव्हान आणि धाडसी कारवाई

शेतकरी फिर्यादीची आर्थिक परिस्थिती आणि मुलीचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांना तातडीने तपासाचे आदेश दिले. पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींची ओळख पटवली.हे आरोपी अत्यंत सराईत असून ते मूळ पत्त्यावर राहत नव्हते. मात्र, गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी कर्नाटक राज्यातील शिवमोगा येथील एका उच्चभ्रू वस्तीत राहत असल्याचे समजले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तत्काळ कर्नाटकात दाखल झाले. तेथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने पाच दिवस शोधमोहीम राबवून सुनील उर्फ बालु रामु बोवी (वय ३२, रा. भद्रावती, जि. शिवमोगा) याला पेस कॉलेज

परिसरातून अटक केली.

​गुन्ह्याची कबुली आणि मुद्देमाल जप्त
आरोपी सुनीलने त्याचा भाऊ विष्णू रामु बोवी याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेले ५ लाख रुपये जप्त केले आहेत. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध राज्यांत बॅगलिफ्टिंगचे गुन्हे दाखल आहेत.
​यांनी बजावली महत्त्वाची भूमिका ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, श्रेणीक लोढा आणि पो.नि. सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि अविनाश जायभाये, दिपक लेकुरवाळे, चाँद शेख, गणेश पाटील, गजानन गोरले, राजू आडवे, पवन मखमले आणि ऋषी खंडेराव यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!