बुलढाण्यात मुख्य शासकीय ध्वजारोहणाला तिन्ही मंत्र्यांची पाठ; जिल्ह्याला मंत्र्यांचे वावडे?
पालकमंत्री, सह-पालकमंत्री आणि केंद्रीय मंत्री तिघेही अनुपस्थित; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तिरंगा वंदन

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा वर्धापन दिन आज देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र, बुलढाणा जिल्ह्याच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीचा एक वेगळाच ‘विक्रम’ पाहायला मिळाला. जिल्ह्याला दोन-दोन पालकमंत्री आणि केंद्रात वजनदार मंत्रीपद असूनही, मुख्य शासकीय सोहळ्यात एकाही मंत्र्याने उपस्थिती न लावल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी फडकवला तिरंग
बुलढाणा येथील पोलीस मैदानावर आज २६ जानेवारी रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. परंपरेनुसार या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री ध्वजारोहण करतात. मात्र, पालकमंत्री मकरंद आबा पाटील आणि सह-पालकमंत्री संजय सावकारे या दोघांपैकी कोणीही उपस्थित न राहिल्याने अखेर जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस दलाने तिरंग्याला मानवंदना दिली.
केंद्रीय मंत्र्यांचीही अनुउपस्थिती ;राजकीय चर्चांना उधाण
केवळ पालकमंत्रीच नाही, तर जिल्ह्याचे सुपुत्र असलेले केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे देखील या मुख्य सोहळ्याला उपस्थित नव्हते. दुसरीकडे, बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर हे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांच्याकडे अकोल्याच्या ध्वजारोहणाची जबाबदारी होती. मात्र, पालकमंत्री मकरंद आबा पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे हे दोन्ही मंत्री बुलढाण्याच्या मुख्य कार्यक्रमात का फिरकले नाहीत? असा सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत.
जनतेमध्ये नाराजीचा सूर
“जिल्ह्याला तीन-तीन मंत्री असूनही एकालाही जिल्ह्याच्या मुख्य मुख्यालयातील ध्वजारोहणासाठी वेळ मिळू नये का?” अशा शब्दांत नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. एरवी विविध राजकीय कार्यक्रमांना आणि सत्कार समारंभांना मंत्र्यांची मांदियाळी असते, मग राष्ट्रीय सणाच्या दिवशीच मंत्र्यांचे पाय जिल्ह्याला का लागले नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
स्पष्टीकरणाकडे लक्ष
प्रजासत्ताक दिनासारख्या अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय सोहळ्यातून जिल्ह्याच्या मुख्य नेतृत्वाने काढलेली ही पळवाट भविष्यात चर्चेचा विषय ठरणार आहे. या अनुपस्थितीबद्दल आता संबंधित मंत्र्यांकडून काय स्पष्टीकरण दिले जाते किंवा यामागे काही विशेष राजकीय कारण आहे का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




