बुलढाण्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जंगी अभिवादन; शिवसैनिकांचा उत्साह ओसंडून वाहिला

आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत वारकरी भवनात सोहळा; नगराध्यक्षांसह नवनिर्वाचित नगरसेवकांची मांदियाळी

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: मराठी माणसाची अस्मिता आणि हिंदुत्वाचे ज्वलंत प्रतीक, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज बुलढाणा शहरात मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेनेच्या वतीने बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अभिवादन सोहळा संपन्न झाला.

​-वारकरी भवनात आदरांजलीचा महापूर-

शहरातील वारकरी भवन येथे आज, २३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी आमदार संजय गायकवाड यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. बाळासाहेबांनी मराठी अस्मिता आणि हिंदुत्वासाठी दिलेल्या लढ्याचा यावेळी गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला.

‘बाळासाहेबांचे विचार हीच आमची ताकद’ – आमदार गायकवाड

उपस्थितांना संबोधित करताना आमदार संजय गायकवाड म्हणाले की, “बाळासाहेबांनी दिलेला स्वाभिमानाचा मंत्र आणि जनतेशी असलेले नातं हीच शिवसेनेची खरी ताकद आहे. त्याच विचारांवर चालत बुलढाणा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” चंदीगड येथे उपचार घेऊन परतल्यानंतर आमदार गायकवाड यांनी तातडीने कामाला सुरुवात केली असून, त्यांनी शहरातील पाणीपुरवठा, आरोग्य, रस्ते आणि स्वच्छता या प्रश्नांवर मॅरेथॉन बैठका घेऊन अधिकार्यांना निर्देश दिल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

दिग्गज नेत्यांची उपस्थिती

या सोहळ्याला नगराध्यक्षा सौ. पूजाताई संजय गायकवाड, युवानेते मृत्युंजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, विधानसभा समन्वयक गणेशसिंग राजपूत, उपनगराध्यक्ष गजेंद्र दांदडे, शहरप्रमुख आशिष जाधव यांच्यासह शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकतेचे आणि शक्तीचे दर्शन

नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर नगर परिषदेतील शिवसेनेचे संख्याबळ आणि कार्यकर्त्यांमधील उत्साह पाहता, हा कार्यक्रम शिवसेनेच्या एकतेचे आणि शक्तीचे प्रदर्शन ठरला. उपस्थितांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देत सामाजिक न्याय आणि विकासासाठी काम करण्याची शपथ घेतली.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!