अमरावतीत राजकीय भूकंपाचे धक्के; अचलपूर नगरपरिषदेत भाजप आणि ‘एमआयएम’ची युती!

अकोल्याच्या अकोट पॅटर्नची पुनरावृत्ती; सभापती पदासाठी दोन टोकाची विचारधारेचे पक्ष एकत्र..

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

अमरावती: राज्यातील राजकारणात सत्तेसाठी कधी कोण कोणासोबत जाईल, याचा नेम उरलेला नाही. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपरिषदेत अशाच एका अनपेक्षित राजकीय युतीने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. दोन टोकाच्या परस्परविरोधी विचारधारेचे पक्ष असलेले भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) यांनी सभापती पदाच्या निवडणुकीत चक्क एकमेकांना साथ दिली आहे. या युतीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

​सभापती पदासाठी विचित्र समीकरण
अचलपूर नगरपरिषदेत विविध समित्यांच्या सभापती पदाच्या निवडी पार पडल्या. यामध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपने ‘एमआयएम’ची मदत घेतली. एमआयएमचे ३, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे २ आणि ३ अपक्ष नगरसेवकांचा गट भाजपच्या साथीला आला. या युतीमुळे एमआयएमच्या नगरसेवकाला ‘शिक्षण व क्रीडा समिती’चे सभापती पद बहाल करण्यात आले आहे. एरवी एमआयएमवर कट्टर टीका करणाऱ्या भाजपने स्थानिक पातळीवर सत्तेसाठी केलेला हा तडजोड अनेकांच्या पचनी पडलेली नाही.

-​अकोट पॅटर्नची झाली आठवण-

यापूर्वी अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेतही अशाच प्रकारे भाजप आणि एमआयएमने हातमिळवणी केली होती. त्यावेळी खुद्द तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करून ही युती अमान्य केली होती आणि संबंधित नेत्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. आता अचलपूरमध्ये त्याच पॅटर्नची पुनरावृत्ती झाल्याने पक्षश्रेष्ठी यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

सत्तेच्या लालसेपोटी युती?

या युतीमुळे विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. “भाजपला सत्तेसाठी आता एमआयएमही चालते का?” असा सवाल विचारला जात आहे. दुसरीकडे, एमआयएमनेही आपल्या तत्त्वांना मूठमाती देऊन भाजपशी हातमिळवणी केल्याने मुस्लीम मतदारांमध्येही उलटसुलट चर्चा सुरू आहे.

-​पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेकडे लक्ष-

अचलपूरमधील या ‘अजब’ युतीची माहिती वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचली असून, भाजप आणि एमआयएम या दोन्ही पक्षांचे प्रदेश नेतृत्व या जिल्हास्तरीय युतीवर काय कारवाई करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!