बुलढाण्यात या कार्यालयासमोर उभारण्यात येणार “स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भव्य पुतळा”
नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड यांनी पदभार स्वीकारताच घेतला मोठा निर्णय; २३ जानेवारीच्या विशेष सभेत येणार ठराव

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा नगर परिषदेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा भव्य पुतळा उभारण्याचा मानस नगर परिषदेने व्यक्त केला असून, नवनिर्वाचित नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड यांनी आपल्या पहिल्याच विशेष सभेत याबाबतचा ठराव मांडण्याचे निश्चित केले आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, आमदार संजय गायकवाड यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून विकासाची मोठी खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.
-अस्वलाची प्रतिकृती हलवून सावरकरांचा पुतळा बसवणार-
नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिलीच विशेष सभा २३ जानेवारी रोजी आयोजित केली आहे. या सभेच्या विषय सूचीमधील क्रमांक ८ नुसार, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वनविभागामार्फत उभारण्यात आलेली अस्वलाची प्रतिकृती त्या ठिकाणाहून हलवण्यात येणार आहे. ही प्रतिकृती पंडित कानडे शास्त्री उद्यान किंवा राणीच्या बागेत हस्तांतरित करण्यात येईल आणि त्याच मोक्याच्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा उभारण्याबाबत सविस्तर चर्चा व निर्णय घेण्यात येईल.
-राजकीयदृष्ट्या ‘सिक्सर’ची चर्चा-
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून राज्य स्तरावर अनेकदा भाजप, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये राजकीय वादंग पाहायला मिळतो. अशातच बुलढाणा नगर परिषद बहुमतात काबीज केल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजाताई गायकवाड यांनी पदभार घेताच घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, पहिल्याच बॉलवर ‘सिक्सर’ मारत आमदार गायकवाड यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपली पकड अधिक घट्ट केली आहे.
-प्रशासकीय हालचालींना वेग-
बुलढाणा नगर परिषदेवर आता शिवसेनेचे आ.संजय गायकवाड यांचे वर्चस्व असून, या पहिल्याच विशेष सभेतील निर्णयाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सावरकरांचा पुतळा उभारण्याच्या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि हिंदुत्ववादी संघटनांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. २३ जानेवारीच्या सभेतील या ठरावाकडे आता सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.




