हिवरा आश्रम येथे उद्या भव्य महापंगत ! 2 लाख भाविक घेणार एकाच पंगतीत महाप्रसादाचा लाभ..

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आयोजित मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे वेकानंद जन्मोत्सव सोहळयाची सांगता महाप्रसाद वितरणाने आज शनिवारी 10 जानेवारी रोजी आयोजन करण्यात येणार आहे. विवेकानंद जन्मोत्सवाच्या भव्य महापंगतीने सांगता होणार आहे. त्यानिमित्त भाविकांना 200 क्विंटल गहूपुरी, 200 क्विंटल वांगेभाजीच्या वैदर्भिय चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. हा महाप्रसाद बनविण्यास शुक्रवारी 09 जानेवारीच्या मध्यरात्री विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते यांनी कढईत पहिली पुरी सोडून महाप्रसाद तळण्यास सुरुवात झाली. तब्बल 15 तासांच्या पाकसिद्धीनंतर महाप्रसाद तयार केला जातो.
विवेकानंद जन्मोत्सवासाठी राज्यभरातून भाविक-भक्त विवेकानंद आश्रमात दाखल झाले आहे. भाविक भक्तांच्या मांदियाळीने हिवरा आश्रम फुलला आहे. विवेकानंद आश्रमाच्या व्यासपीठावरील विविध धार्मिक, सांस्कृतिक व वैचारिक कार्यक्रमांचा भाविक आस्वाद घेत आहेत. तीन हजार स्वयंसेवकांसह विवेकानंद आश्रमाचे हजारो कार्यकर्त्यांच्या मदतीने हा महाप्रसाद बनविण्यात आला. आज शनिवारी 2 ते 5 वाजेदरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिस्तपद्धतीने भव्य महाप्रसाद वितरण केले जाणार आहे. या सोहळ्याची सांगता होणार आहे. राज्यभरातून आलेल्या भाविकांसह पंचक्रोशीतील भाविकांना महाप्रसाद एकाच पंगतीमध्ये एकाच वेळेस वितरित केला जाणार आहे. राज्यात भव्य प्रमाणावर संपन्न होणाऱ्या या विवेकानंद जयंती महोत्सवातील महाप्रसादासाठी दोन लाख भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतील, अशी माहिती विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी दिली आहे.




