बुलढाणा अर्बनची तिजोरी भक्कम; ठेवीदारांना दिला राधेश्याम चांडक यांनी विश्वास…

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलडाणा: बुलढाणा अर्बन बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत आहे. मल्टिस्टेट स्तरावर सुमारे ४ हजार कोटी रुपयांची शिल्लक उपलब्ध आहे. त्यामुळे ठेवीदारांनी पैसे मागितल्यास तात्काळ देणे शक्य आहे, अशी ग्वाही बँकेचे चेअरमन राधेश्याम चांडक यांनी दिली. मात्र पसरलेल्या अफवांवर ठेवीदारांनी विश्वास न ठेवता, कुठल्याही परिस्थितीत ठेवी सुरक्षित असल्याचेही ते म्हणाले.
मराठवाड्यात एका शाखेसंदर्भात उडालेल्या अफवेवर स्पष्टीकरण देताना राधेश्याम चांडक यांनी सांगितले की, बँकेच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखली असून ठेवीदारांचा विश्वास अबाधित आहे. कोणत्याही प्रकारची अफवा किंवा संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी बँक प्रशासन सातत्याने माहिती देत आहे. बँकेकडे पुरेशी तरलता (Liquidity) असल्यामुळे ठेवीदारांच्या रकमेला कोणताही धोका नाही.
दरम्यान, काही ठिकाणी पसरवण्यात येणाऱ्या अफवांमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र प्रत्यक्षात बँकेची आर्थिक घडी मजबूत असून, कर्जवाटप, वसुली आणि दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू आहेत.ठेवीदारांनी अफवांवर विश्वास न ठेवता बँकेच्या अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करताना चेअरमन चांडक यांनी स्पष्ट केले की, बुलढाणा अर्बन बँक ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यास पूर्णतः सक्षम आहे.




