संतापलेल्या वडिलांनी अंढेरा जंगलात निर्दयीपणे दोन जुळ्या मुलींचा गळा कापून केला खून…

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
चिखली: मानवी संवेदना, प्रेम आणि पितृत्व यांचा गळा घोटणारी हृदय पिळवटून टाकणारी घटना अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. वाशीम जिल्ह्याच्या मनोरा तालुक्यातील ग्राम रुई येथील रहिवासी आणि पुण्यातील खासगी कंपनीत कार्यरत असलेल्या राहुल शेषराव चव्हाण या व्यक्तीने बुलढाणा जिल्ह्यातील अढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील अंढेरा जंगलात स्वतःच्या दोन जुळ्या लहान मुलींचा निर्दयीपणे गळा कापून खून केल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे.
पोलिसांकडून माहिती मिळाली की, राहुल चव्हाण व त्याची पत्नी यांच्यात पैशांवरून वाद सुरू होते. पुणे येथे हा वाद गंभीर स्वरूपात झाला होता. त्यावेळी पत्नीने संतापून ‘मुलं तूच सांभाळून घे’ असे सांगितले, त्यानंतर संतापलेल्या राहुलने आपल्या दोन निष्पाप मुलींना घेऊन 21 ऑक्टोबर रोजी आपल्या रुई गावाकडे निघाला. अंढेरा फाटा परिसरातील अंचरवाडी जंगलात, 21 ऑक्टोबर रोजीच त्याने आपल्या दोन्ही जुळ्या मुलींचा गळा कापून निर्दयीपणे खून केला.यानंतर राहुलने काल शनिवारी 25 ऑक्टोबर रोजी वाशिम पोलीस ठाण्यात हजर होत आपल्या भीषण गुन्ह्याची कबुली दिली.पोलिसांनी तात्काळ अंढेरा हद्दीतील जंगलात धाव घेतली असता दोन्ही बालिकांचे कुजलेले मृतदेह आढळून आले. घटनास्थळी डीवायएसपी संतोष खराडे, वनरक्षक गजानन पोटे (अंचरवाडी बीट), ठाणेदार शक्करगे, एपीआय रामकृष्ण भाकडे, पीसी लक्ष्मण महाले, पीसी किशोर मारकड, एलसीबी वाशीमचे एचसी राहुल व्यवहारे, एनपीसी राजकुमार यादव, पीसी महेश वानखडे, डीपीसी मिलिंद चंदकेशाला, तसेच जारवार, फूसे, सोनकांबळे, मुंडे, मेमाने व जाधव आदी अधिकारी उपस्थित होते.या घटनेने बुलढाणा जिल्ह्यासह वाशीम जिल्हा देखील हादरून गेला आहे.




