टुनकी-सोनाळा रस्त्यावर भीषण अपघात; दोन ठार, सहा जण गंभीर जखमी..

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा टुनकी रस्त्यावर काल शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. केळीने भरलेला ट्रक उलटल्याने हा अपघात घडला. ही घटना टुनकी गावाजवळ रात्री सुमारे ०९:१५ वाजता घडली. ग्राम टुनकीकडून सोनाळामार्गे आकोटकडे केळी घेऊन जाणारा ट्रक नियंत्रण सुटल्याने उलटला. सदर ट्रक अंजनगाव सुर्जी येथे केळी घेऊन जात होता, अशी माहिती मिळाली आहे. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, सोनाळा येथे दाखल करण्यात आले. त्यापैकी तीन गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांसह सर्व जखमी अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.




