बुलढाणेकरांनी गाजवली अ.भा. नाट्य परीषद एकांकिका स्पर्धा..

नामदेव पायरी एकांकिकेला मुंबईच्या अंतीम फेरीत तीन बक्षिसे..

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

बुलढाणा :आशय, विषय व सादरीकरणाने समृध्द असलेल्या ‘नामदेव पायरी’ या रवींद्र इंगळे चावरेकर लिखित व विजय सोनोने दिग्दर्शित एकांकिकेने मुंबईची अ.भा. नाट्य परीषदेची एकांकिका स्पर्धा गाजवून सोडली. अंतीम फेरीत तीन बक्षिसे एकांकिकेला प्राप्त झालीत.

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्यावतीने महाराष्ट्रातील हौशी नाट्यकर्मींसाठी प्राथमिक व अंतीम अशा दोन फेरीत एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अकोला येथे पार पडलेल्या प्राथमिक फेरीत स्थानिक वसंतलक्ष्मी बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने सादर झालेल्या नामदेव पायरी या एकांकिकेने विजय प्राप्त केल्यानंतर मुंबई येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हिंदी मराठी नाट्य व चित्रपट सृष्टीतील दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडलेल्या अंतीम फेरीतही नामदेव पायरीने तीन बक्षिसे प्राप्त केली. यामध्ये उत्कृष्ट लेखनासाठी रवींद्र इंगळे चावरेकर यांना तृतीय बक्षिस, उत्कृष्ठ संगीतासाठी अक्षयसिंग राजपूत यांना द्वितीय क्रमांक तर उत्कृष्ठ अभिनयासाठी गणेश देशमुख यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला. सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी व ख्यातनाम समिक्षक रवींद्र पाथरे, विजय केंकरे, सौरभ पारखे, सुहास जोशी हे स्पर्धेचे प्रमुख परीक्षक होते.

अ. भा. नाट्य परीषदेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रशांत दामले, जेष्ठ सिने अभिनेते मोहन जोशी , सिने अभिनेत्री सुहास जोशी,विजय गोखले यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलावंत व नाट्य परिषदेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीवर संत नामदेवांनी थेट सवाल उपस्थित करणारी भूमिका मांडल्याचे नाटकातून दर्शविण्यात आले होते. आशय विषय व सादरीकरण तसेच प्रत्यक्ष वाद्यवृंदाचा वापर करुन संगीत दिल्याने रसिकांमध्ये या नाटकाची जोरदार चर्चा रंगली. नामदेव पायरीचे लेखक रवींद्र इंगळे चावरेकर, दिग्दर्शक विजय सोनोने व प्रमुख भूमिका साकारणारे गणेश देशमुख यांच्यासह सदर नाटकात प्रकाश योजना लक्ष्मीकांत गोंदकर यांनी केली. नेपथ्य पराग काचकुरे यांनी केले. वेशभूषा आनंद संचेती यांनी केली.

रंगभूषा डॉ. स्वप्नील दांदडे यांनी केली. संगीत संयोजन अजयसिंग राजपूत, अक्षयसिंग राजपूत यांनी केले. यामध्ये तबल्यावर शाम मानकर, पखवाज अक्षयसिंग राजपूत, टाळवर अनुजसिंग राजपूत यांनी साथसंगत केली. कलावंत म्हणून गणेश देशमुख यांच्यासोबत प्रसाद दामले यांनी उत्कृष्ट भूमिका साकारली. रंगमंच व्यवस्था गणेश बंगाळे, तुषार काचकुरे, धनंजय बोरकर, रविकांत इंगळे, विवेक संचेती, वैष्णवी गोरे- अहेर यांनी सांभाळली. सदर एकांकिकेच्या प्रयोगाची संपूर्ण महाराष्ट्रात मागणी होत असून २८ सप्टेंबरला नागपूर येथे राजाराम दीक्षित वाचनालय सीताबर्डी यांच्यावतीने आयोजित नाट्य महोत्सवात देखील सादरीकरणाचा मान एकांकिकेला प्राप्त झाला.

मुंबई येथे महाराष्ट्रातून आलेल्या व्यावसायिक पातळीवरील नाट्यकृतींना बुलढाण्याच्या नामदेव पायरीने जोरदार टक्कर देत स्वतःचा प्रभाव निर्माण केला, याबद्दल नाट्य क्षेत्रातील सर्वांनीच या संघाचे कौतुक केले आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!