एलसीबीची गुटखा माफियांविरुद्ध कारवाई,१.१३ कोटींचा गुटखा जप्त; तिघांना अटक

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यात गुटखा माफियांविरुद्ध पोलिसांनी आणखी एक मोठी धडक कारवाई केली आहे. बुलढाणा एलसीबी शाखेने सोमवारी रात्री मेहकर तालुक्यातील फर्दापूर टोलनाका येथे कारवाई करत तब्बल १ कोटी १३ लाख रुपयांचा गुटखा आणि दोन ट्रकसह एकूण १ कोटी ४३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत तिघांना करण्यात आली असून, ही आतापर्यंतची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
अमरावतीहून मुंबईकडे गुटखा तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर ‘एलसीबी’च्या पथकाने फर्दापूर टोलनाक्यावर सापळा रचून दोन ट्रक पकडले. त्यात गुटख्याने भरलेली तब्बल १ कोटी १३ लाख ९ हजार ७६० रुपयांची २६४ पोती, ३० लाखांचे दोन ट्रक, असा १ कोटी ४३ लाख ९ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी मोहम्मद इम्रान मोह. हफिज (२८, रा. बियाबानी मोहल्ला, अचलपूर), अजीम बेग हाफिज बेग (३६, रा. अन्सारनगर, अमरावती), एजाज अहमद अजीज अहमद (३१, रा. शिरजगाव, ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) या तिघांना अटक केली आहे.




