राज्यातील शिक्षकांना मिळणार आरोग्य कवच, धर्मवीर आनंद दिघे कॅशलेस शिक्षक कुटुंब आरोग्य कवच योजनेला तत्वतः मान्यता

चंद्रशेखर भोयर यांच्या पाठपुराव्याला यश, मागणी मान्य

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

अमरावती : राज्य सरकारने राज्यातील शिक्षकांना आरोग्य कवच प्रदान करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच धर्मवीर आनंद दिघे कॅशलेस शिक्षक कुटुंब आरोग्य कवच योजना राज्यभरात लागू होणार आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाने या योजनेस तत्त्वतः मान्यता दिली असून, यासाठी उच्चस्तरीय समितीही स्थापन करण्यात आली आहे.

शिक्षकांसाठी कॅशलेस योजना लागू व्हावी यासाठी शिक्षक महासंघाचे अध्यक्ष व भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक चंद्रशेखर भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून या मागणी संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन मागणी मान्य झाल्याने राज्यातील शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शिक्षकांना कॅशलेस आरोग्य कवच देणाऱ्या या योजनेचा आराखडा आणि निकष निश्चित करण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष समिती गठीत करण्यात आली आहे.या समितीचे नेतृत्व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे करतील, तर महात्मा ज्योतिबा फुले योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण आणि उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख आरोग्यदूत मंगेश चिवटे, शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी म्हणून प्रा. डॉ. बापूसाहेब अडसूळ, प्रा. सुभाष मोरे यांसह उच्चपदस्थ अधिकारी या समितीत सहभागी असणार आहेत. समिती पुढील तीन ते चार महिन्यांत राज्यभरातील शिक्षक प्रतिनिधींना भेटून, आरोग्य कवच योजनेचे सर्व अंग सखोलपणे ठरवेल. या योजनेअंतर्गत शिक्षकांना व त्यांच्या कुटुंबांना मोफत शस्त्रक्रिया, उपचार व आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत, असे चंद्रशेखर भोयर यांनी सांगितले.

शिक्षक बांधवांसाठी या कॅशलेस आरोग्य कवच योजनेला राज्य सरकारकडून तत्त्वतः मान्यता मिळाल्याने शिक्षक महासंघाचे अध्यक्ष व भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक चंद्रशेखर भोयर आणि संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे विशेष आभार मानले आहे.

-सर्व शिक्षकांना लाभ मिळणार – भोयर-

आतापर्यंत केवळ पूर्ण अनुदानित शाळांमधील शिक्षकांनाच वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ मिळत होता. मात्र अंशदानित शिक्षक या लाभांपासून वंचित होते. शिक्षक संघटनांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर सरकारने हे सकारात्मक पाऊल उचलले आहे. आगामी तीन ते चार महिन्यात या योजनेचा अंतिम मसुदा तयार होणार असून लवकरच ही योजना लागू होणार आहे. या योजनेमुळे शिक्षकांना आर्थिक दिलासा मिळणार असून वेळेची बचत होईल तसेच सर्वांना समान लाभ मिळणार असल्याचे चंद्रशेखर भोयर यांनी सांगितले.

-शिक्षकांना कसा होणार फायदा?

आर्थिक दिलासा : उपचाराचा खर्च थेट शासन किंवा विमा कंपनीमार्फत रुग्णालयाला दिला जाईल.
वेळेची बचत : वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी सरकारी कार्यालयांमध्ये फेऱ्या मारण्याची गरज नाही.
तणावमुक्ती : आजारपणात आर्थिक चिंतेऐवजी उपचारावर लक्ष केंद्रित करता येईल.
सर्वांसाठी समान लाभ : अनुदानित, अंशदानित असा भेद न राहता सर्व शिक्षकांना आरोग्य सुरक्षा मिळेल.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!