लोणार सरोवर परिसरातील १२ मंदिरे पाण्याखाली
नवरात्र उत्सवात मातेच्या भक्तांचे टेन्शन वाढले

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
लोणार: लोणार येथील जागतिक पातळीवर विख्यात असलेल्या खाऱ्या पाण्याच्या सरोवर परिसराला धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. सरोवर परिसरात हेमाडपंथी, चालुक्य व यादवकालीन कालखंडातील सुमारे २० हून अधिक लहान-मोठी मंदिरे आहेत. यापैकी १२ मंदिरांना गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसाच्या पाण्याचा विळखा बसलेला आहे. त्यामुळे ही मंदिरे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत.
सरोवराच्या काठावर वसलेली दगडमोड, गणपती, शिव मंदिर आणि इतर प्राचीन वास्तू पाण्याच्या २.६९ मीटरने वाढलेल्या पातळीमुळे बुडाल्या असून, त्यांच्या संरचनेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
मोठ्या खाऱ्या पाण्याच्या सरोवराचे पर्यावरणीय आणि आशिया खंडातील सर्वात सरोवरांपैकी एक असलेल्या लोणार ऐतिहासिक महत्त्व मोठे आहे. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सरोवरातील पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.
सध्या सुरू झालेल्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या आयोजनावर मोठे संकट ओढवले आहे. विशेषतः सरोवराच्या मध्यभागी असलेल्या कमळजा माता मंदिरावर प्रत्यक्ष परिणाम झाला आहे. मंदिराच्या संपूर्ण ओट्यापर्यंत पाणी पोहोचले असून, भाविकांना दर्शनासाठी पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे.
दरवर्षी नवरात्रीत हजारो श्रद्धाळू या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात आणि माता कमळजेची आराधना करून आरोग्य, संतानप्राप्ती व समृद्धीसाठी प्रार्थना करतात. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि मंदिरांचे रक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे.
-यंदा सरोवराची पाणी पातळी गंभीर-
सरोवरातील झऱ्यांच्या नैसर्गिक प्रवाहासोबतच परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सरोवरातील पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. २०२२ साली, तब्बल १४ वर्षांनंतर पहिल्यांदा अशी वाढ नोंदवली गेली होती. तर २०२४ मध्येही ही पातळी २.६९ मीटरपर्यंत पोहोचली होती. आता २०२५ मध्ये, पावसाळ्यात झालेल्या अति पावसामुळे ही स्थिती अधिक गंभीर झाली असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. व अजून ही सुरू असलेल्या पावसामुळे कदाचित मंदिरामध्ये पण पाणी जाते की काय अशी चिंता मातेच्या भक्तांना पडली आहे




