गॅस कटरने एटीएम फोडून १०.८५ लाखांची रोकड चोरट्यांनी केली लंपास

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

चिखली : चिखली शहरातील राऊतवाडी स्टॉप भागातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडून तब्बल १० लाख ८५ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना  उघडकीस आली आहे.या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

स्टेट बँकेच्या चिखली शाखेच्या अखत्यारीत सहा एटीएम कार्यरत आहेत. त्यांची देखभाल हिताची कंपनी करते, तर कॅश लोडिंगचे काम सीएमएस कंपनीकडे आहे. २० सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास सीएमएस कंपनीचे कृष्णा सुभाष सपकाळ यांनी राऊतवाडी येथील वायाळ कॉम्प्लेक्समधील या एटीएममध्ये रोकड भरण्याचे काम पूर्ण केले होते.

यानंतर २१ सप्टेंबरच्या पहाटे सव्वा दोनच्या दरम्यान चार अज्ञात चोरट्यांनी ही संधी साधली. प्रथम त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर काळा स्प्रे फवारून ते निष्क्रिय केले, सायरनच्या वायर तोडल्या आणि नंतर गॅस कटरने मशीन कापून कॅश कॅसेट पळवून नेले.

घटनेची माहिती मिळताच शाखा व्यवस्थापक निलंजन हलदर यांनी उपप्रबंधक परेश राजेंद्र केचे यांना घटनास्थळी पाहणीस पाठविले. केचे यांनी सीएमएसचे सपकाळ यांच्यासह एटीएम तपासले असता, मशीन कापलेले व रोकड ठेवलेले कॅसेट गायब असल्याचे दिसून आले. तसेच एटीएम केंद्रातील व बाहेरील कॅमेऱ्यांवर काळा स्प्रे व सायरनची तोडफोड झाल्याचेही स्पष्ट झाले. चॅनल मॅनेजर सचिन सुरडकर यांनी ऑनलाइन मॉनिटरिंग तपासले असता, तब्बल १०.८५ लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे निश्चित झाले.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला असून फिंगरप्रिंट एक्सपर्ट व डॉग स्क्वॉडच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आले आहेत.प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.संपूर्ण सुरक्षा व्यवस्था ठप्प करून चोरट्यांनी एटीएम उध्वस्त करून लाखो रुपयांची रोकड उचलल्याने पोलिसांना आरोपी शोधण्यात मोठे आव्हान उभे राहिले आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!