एक गोर, सव्वा लाखेर जोर’चा नारा देवून बंजारा समाजाचा ऐल्गार
एसटी आरक्षणासाठी बंजारा समाजाचा गुरुवारी एल्गार मोर्चा

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: हैदराबाद गॅझेटियर व सीपी बेरार ॲक्टनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरात एल्गार मोर्चे काढले जात आहेत. याच पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘एक गोर, सव्वा लाखेर जोर…’ असा नारा देत २५ सप्टेंबरला एल्गार मोर्चा धडकणार आहे, अशी माहिती समाजाचे नेते तथा कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. संजय राठोड यांनी रविवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.
एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याचा मुद्दा राज्यभरातील बंजाराबांधवांनी रेटून धरल्याचे सांगत संजय राठोड म्हणाले, बंजारा समाज एसटीमध्ये येतो, याचे अनेक पुरावे आहेत. १० जानेवारी १९५० ला सीपी ॲण्ड बेरार सरकारने बंजारा समाजाला एसटीमध्ये समाविष्ट करण्यास सांगितले आहे. १८७१ ते १९३१ च्या जनगणनेनुसार बंजारा एक स्वतंत्र आदिवासी समाज म्हणून नोंद झाली आहे. त्या आधारावर एसटी आरक्षण मिळायला हवे. कुणाचे आरक्षण काढून आम्हाला द्या, असे आमचे म्हणणे नाही. एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, ही आमची एकच मागणी आहे आणि त्याची पूर्तता करवून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही राठोड यांनी दिला.
बंजारा समाज स्वातंत्र्योत्तर काळापासून खेड्यापाड्यात, वाड्या, वस्त्यात, जंगलात राहणारा समाज आहे. तो आदिवासी असल्याचे सांगत राठोड म्हणाले, तेलंगणात एसटी, कर्नाटकात एससी प्रवर्गात समाजाचा समावेश आहे. अन्य राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रवर्गात बंजारा येतात. यासंदर्भात बऱ्याचवेळा मागणी करूनही बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करून घेण्यात आले नाही. या मागणीसाठी आता जिल्ह्याजिल्ह्यात समाजबांधवांनी एल्गार पुकारला आहे. याच पार्श्वभूमिवर बुलढाणा येथे २५ सप्टेंबरला एल्गार मोर्चा काढण्यात येत आहे. मोर्चात समाजबांधवांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही राठोड यांनी यावेळी केले.
पत्र परिषदेला अभय चव्हाण, जंगलसिंग राठोड, रोहिदास चव्हाण, विनायक राठोड, लक्ष्मण नाईक, भारत राठोड, उमेश राठोड, गुलाबराव राठोड, राजेश राठोड, भूपेश जाधव, साहेबराव चव्हाण, विठ्ठल चव्हाण, भुजंग सर यांची उपस्थिती होती.




